Maharashtra NCP MLA Nilesh Lanke started 1000 bed covid centre in parner – ना कोणता थाट… ना कोणता रुबाब … फक्त आणि फक्त जनतेचा आधार … अशी ओळख निर्माण झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके सध्या आपल्या कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
कोरोनाचे थैमान
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला असून ऑक्सिजन, बेड सर्वच गोष्टींची कमतरता जाणवत आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी ज्या कोणाला शक्य असेल त्याप्रमाणे तो मदत करत आहे. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी यांनी दुसऱ्यांदा शरद पवारांच्या नावाने १ हजार बेडचे कोविड सेंटर उभारले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही त्यांनी केली होती कोविड सेंटरची उभारणी
मागील वर्षी सुद्धा कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील आमदार निलेश लंके यांनी एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारले होते. त्याची दखल खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली होती. लंके यांना त्याच्या या कामाची भेट म्हणून शरद पवारांनी कार्डियाक ॲम्बुलन्स भेट दिली होती.
हे सुद्धा वाचा: रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी शिवसेना आमदाराने मोडली ९० लाखांची एफ. डी.
मागच्याच आठवड्यात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळावी यासाठी आपली ९० लाखांची एफडी मोडून एक नवीन आदर्श सर्व आमदारांसमोर ठेवला होता
त्यांचे मनोगत
माझं काय व्हायचं ते होईल पण ज्या जनतेने मला निवडून दिले आहे तीच जनता आज घाबरून बसली आहे. आणि मी सुद्धा जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाकडे मदतीसाठी जायचे. त्यामुळे मी असुरक्षित असलो, मला काही झाले तरी चालेल पण माझे लोक सुरक्षित असले पाहिजेत, हे शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे आहेत.
कोविड सेंटरसाठी मदतीचा ओघ
आमदार निलेश लंके यांनी सर्वांना आवाहन केल्यानंतर जवळपास १७ लाख रोख रक्कम आणि ५ टन धान्य जमा झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार निलेश लंके यांच्यामार्फत सुरु केलेल्या आरोग्य केंद्रांची माहिती संपूर्ण जगभर पोचल्यानंतर परदेशातून अनेक जण थेट खात्यावर रक्कम पाठवित आहेत. तसेच खूप लोकांनी भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तू दिल्या आहेत. सर्व रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना घाबरून न जाण्याचे आवाहनही निलेश लंके यांनी केले आहे.
कशा प्रकारे घेतली जाते काळजी
कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्यापासून ते अगदी तो डिस्चार्ज होईपर्यंत त्याची सर्व देखभाल ठेवण्यात येते. रुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जात आहे. शरीरातील कोरोना विरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेळी फळे दिली जातात. सकाळी अंडे आणि दूध, नाष्टा, भाजीपाला तर दुपारी आणि संध्याकाळी नॉनव्हेज तसेच शाकाहारी जेवण दिले जाते. योगा, प्राणायाम सारखे व्यायाम देखील घेतले जात आहेत. दिवसातून दोन वेळा रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
जनतेकडून कौतुकाची थाप
आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. आमदार लंके स्वतः रात्रंदिवस या कोविड सेंटर मधील रुग्णांची विचारपूस करत आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येक कोरोना रुग्णांची ते आस्थेने विचारपूस करतात. त्यामुळे लंके यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. स्वतः आमदारच आपल्या तब्बेतीची काळजी घेत आहे आणि आपली विचारपूस करत आहे हे बघून रुग्णांना देखील मोठा आधार मिळत आहे.
कुठे आहे हे कोविड सेंटर
अहमदनगर मधील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल १ हजार १०० बेडचे हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये शंभर ऑक्सिजन बेड आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे.
Great work saheb
खरा जनसेवक