असा आमदार मिळायला भाग्य लागते, ना डोक्याखाली उशी, अंगावर चादर, तरीही कोविड सेंटरमध्येच शांतपणे झोपले आमदार निलेश लंके

MLA Nilesh Lanke – कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे संपूर्ण राज्यात अक्षरशः हाहा:कार उडाला आहे. राज्यात रोज हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेड्स, औषधे यांची कमी असताना अनेकजण मदतीसाठी सरसावत आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी १ हजार बेडचे कोविड सेंटर उभारले होते. दिवस रात्र तिकडे मेहनत घेत असताना आता त्यांचे काही फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरले आहेत.

MLA Nilesh Lanke

१००० बेडचे कोविड सेंटर चालू केले

कोरोनाग्रस्तांना योग्य आणि मोफत उपचार मिळावा म्हणून आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने तब्बल १ हजार बेडचे कोविड सेंटर दोन ठिकाणी उभारले. सर्व सोयीसुविधा असलेले असे हे कोविड सेंटर भाळवणी येथे आहे. याच कोविड सेंटरमुळे आमदार निलेश लंके यांची संपूर्ण महाराष्ट्रमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. आपल्या जनतेची, कोरोना रुग्णांची पूर्णपणे काळजी घेता यावी म्हणून त्यांनी आता दिवस रात्र कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकला आहे.

हे सुद्धा वाचा: आमदार निलेश लंके यांनी उभारले १ हजार बेडचे कोविड सेंटर

कोविड सेंटरमध्येच केला मुक्काम

नेहमीच वेगवेगळ्या कारणाने राज्यभर चर्चेत राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस आमदार हे शरदचंद्र पवार कोविड सेंटरमध्ये मुक्कामी असून त्यांचा कोविड सेंटरमध्ये जमिनीवर झोपलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे आमदार नीलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले असून आमदार निलेश लंके मुक्काम पोस्ट भाळवणी कोविड सेंटर, अशी चर्चा आता जिल्ह्यासह राज्यात होऊ लागली आहे. २४ तासांऐवजी ४८ तासांचा दिवस असता तरी मला वेळ कमीच पडला असता असे नेहमी सांगणारे आमदार लंके सेंटरमध्ये बिछाना टाकून झोपले असून आपल्या साधेपणामुळे संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाले आहेत.

मागच्या वर्षी सुद्धा केली होती मदत

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता गत वर्षी सुद्धा त्यांनी शरदचंद पवार आरोग्य मंदीर चालु करून किमान ४ हजार ५०० गरीब रुग्णांना मदतीचा हात देत एकही रुग्ण न गमवता यशस्वी कोवीड सेंटर चालवले होते. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भाळवणी येथे त्यांनी ११०० बेडचे सुसज्ज असे मोफत आरोग्य मंदीर चालु करून हजारो रुग्णांना जिवदान देणारे निलेश लंके हे महाराष्ट्रात तरुणाईचा उर्जास्त्रोत झाले आहे.

तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध

महाराष्ट्रासह देशभरातून व देशाबाहेरीलही लाखो चाहता वर्ग अल्पावधीतच निर्माण करणारे आमदार लंके हे महाराष्ट्रातील कदाचीत एकमेव आमदार असावे. गेले अनेक आठवडे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आपल्या घरादाराकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत पुर्ण वेळ हजारो रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, इंजेक्शन उपलब्ध करून गरजू रुग्णांपर्यंत पोहचवणे, वृद्ध माता पिता तरुण बंधु भगिणींना प्रत्येक बेडवर जात त्यांची तपासणी करणे, त्यांना मायेचा आधार देणे अशा अनेक भूमिका ते पार पडत आहेत.

एक वेगळीच व्यक्तिरेखा

आपल्या सर्व भूमिका यशस्वीप्रकारे पार पाडणारा अष्टपैलू कलाकार आयुष्याच्या रंगमंचावर वेगवेगळ्या भुमीका पार पडतोय व दिवसाच्या सरते शेवटी रात्री एक ते दिड वाजता ऑक्सीजन कुणाचे कमी झाले, हे सर्व पाहुन नंतर कोवीड सेंटरमध्येच जेवण करणे व तेथेच कार्यकर्त्यांसमवेत झोपणारा हा आमदार नव्हे तर स्वतःला सामान्य जनतेचा सेवक समजणाऱ्या आ. निलेश लंके यांची महाराष्ट्राची जनता एक वेगळीच व्यक्तिरेखा आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.

निलेश लंके यांचे विचार

आपली जनता संकट असताना अहोरात्र त्याच्यासाठी काम करणे ही आपली जबाबदारी असते. आपलीच माणसे अडचणीत आहेत, उपचार असेल, इंजेक्शन असेल, किंवा अजून काही आरोग्याची समस्या असेल तर सगळ्या सुविधा तत्काळ उपलब्ध झाल्या पाहिजेत हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो असे त्यांचे विचार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांची भाळवणी येथील कोविड सेंटरचे चर्चा राज्यात असून राज्यातील प्रत्येक मतदारसंघात असे सेंटर चालू झाले पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्रभरातून व्यक्त होऊ लागली आहे.

इतर महत्वाचे लेख

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍

2 thoughts on “असा आमदार मिळायला भाग्य लागते, ना डोक्याखाली उशी, अंगावर चादर, तरीही कोविड सेंटरमध्येच शांतपणे झोपले आमदार निलेश लंके”

Leave a Comment

error: Content is protected.